भुसावळ संदीप होले/दत्तात्रय गुरव | भुसावळ ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात लौकीक असणारी अ वर्गाची नगरपालिका आहे. शहराची लोकसंख्या मोठी असली तरी शहराची हद्द आणि ग्रामीण हद्दीतील लोकवस्ती असणार्या भागांना नागरी सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना हवे असल्यास भुसावळ शहराची हद्दीवाढ करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. शहरातील जुना सातारा भागात आयोजीत विकासकामांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
व्हिडीओसह सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज जुना सातारा भागात असणार्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर याच चौकात आयोजीत कार्यक्रमात शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उदघाटन देखील उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार रक्षाताई खडसे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, माजी आमदार मनीष जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी नगरपालिकेच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. तर कोरोना काळात विशेष कामगिरी बजावलेल्या कोरोना योध्द्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी प्रास्ताविकातून शहर विकासाच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात शहरातील कामांना गती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संजय सावकारे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्यावरून सोशल मीडियात विविध प्रतिक्रिया उमटल्याचे सांगितले. अजितदादांनी भुसावळात वारंवार यावे अशा मिश्कील प्रतिक्रिया देखील उमटल्याची माहिती त्यांनी दिली. तर सध्या सुरू असलेली कामे आधीच सुरू असती तर बरे झाले असते असेही ते म्हणाले. अमृत योजनेमुळे अनेक अडचणी झाल्याची तक्रार देखील त्यांनी दिली.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या भाषणात भुसावळ शहरातील विकासकामांना गती मिळाली असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शहरातील स्थिती ही काही तात्काळ बदलणार नसली तरी आता बदल दिसू लागले आहेत. विशेष करून आधी रस्त्यांमध्ये खूप खड्डे असतांना आता रस्त्यांची कामे होऊ लागली आहेत. यातच अमृत योजनेतील दुसर्या टप्प्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात भुसावळातील गुन्हेगारीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, काही झारीतील शुक्राचार्य हे शहर विकासाच्या आड येत आहेत. येथील विकासकामांमध्ये टेंडर टाकून यात खोडा घालण्याचे काम शहरात होत आहे. यातच शहरातील वाढलेली गुन्हेगारी पाहता येथे सीसीटिव्ही कॅमेर्यांची नितांत आवश्यकता असून यासाठी आपण जिल्हा नियोजन मंडळातून आवश्यक तो निधी देण्यासाठी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून त्यांनी कुणाच्या दबावाला बळी पडता कामा नये असेही ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
याप्रसंगी अजित पवार म्हणाले की, कधीपासूनच भुसावळ येथे येण्याचे नियोजन सुरू होते. मात्र ते आज जमून आले आहे. भुसावळ ही मोठी आणि अ वर्गाची नगरपालिका आहे. अगदी बारामती येथील नगरपालिकेपेक्षा भुसावळ मोठे आहे. येथील नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या हद्दींमध्ये खूप मोठा भाग येत असून येथील कामांबाबत अडचण येत असते. यामुळे जर लोकांना हवे असेल तर आपण भुसावळच्या हद्दवाढीसाठी काम करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली. भुसावळ हे ऐतिहासीक शहर असून शहराला उज्ज्वल असा वारसा आहे. शहरातील गुन्हेगारीबाबत जर सीसीटिव्ही हवे असल्यास यासाठी आपण मदत करू असे ना. अजितदादा म्हणाले. तर शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यात येणार असून कुणाचीही दहशत शहरात नको अशी भूमिका अजितदादांनी मांडली. तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या पाणी पुरवठा विभागाला राज्य सरकारने साडे सात हजार कोटी रूपये दिले असून याच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना राबविण्यात येत असल्याची वाखाणणी उपमुख्यमंत्र्यांनी केली. नगराध्यक्षांनी योग्य नियोजन करून योजनांचे कार्यान्वयन करावे असे आवाहन त्यांनी केले. तर तापी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही विषयांवरून कानपिचक्या देखील दिल्या. जळगाव जिल्ह्यातील विविध कारखाने हे बंद पडत असतांना बाहेरची मंडळी येऊन ते चालवू शकतात. तर स्थानिकांना का चालविता येत नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा विचार करता लसीकरणाला गती देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. तर संजय सावकारे हे कोणत्याही चिन्हावर उभे असले तरी निवडून येत असल्याचे कौतुक करून आता पुढील वेळेस चिन्हा बदलवा असा सूचक सल्ला देखील त्यांनी दिला.
खालील व्हिडीओत पहा या कार्यक्रमाचे लाईव्ह कव्हरेज.