भुसावळ प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या कोरोना योध्दा सहाय्य समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे भुसावळ येथील एका दाम्पत्याला हॉस्पीटलने अतिरिक्त आकारणी केलेले ९२ हजार रूपये परत मिळाले आहे.
याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या आपत्तीमध्ये अनेक रूग्णालयांनी बिलामध्ये अतिरिक्त आकारणी केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. याला आळा घालण्यासाठी भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी कोविड योध्दा सहाय्यता समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांना आता यश लाभत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पाठपुराव्याने एका दाम्पत्याला अतिरिक्त आकारणीचे पैसे परत मिळाले आहेत.
भुसावळ येथील रहिवासी दिलीपसिंग चौधरी आणि सौ.शोभा चौधरी यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने ऑगस्ट २०२० या काळात जळगाव येथील रुबी हॉस्पिटल संचलित कॉविड केअर सेंटर मध्ये भरती करण्यात आले होते. या १७ दिवसांचे श्री. चौधरी यांवर बिल रु.२,२६,२०० आणि ७ दिवसांचे सौ. चौधरी यांचे बिल रु. ९३,५०० असे एकूण या दोघांचे रु.३,१९,७०० बिल अदा करण्यात आले. सर्व सोपस्कार पार पडल्यावर त्यांनी भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा सहाय्य समितीचे भुसावळ शहर अध्यक्ष डॉ. नि. तु. पाटील यांच्याशी वाढीव बिलासंबंधी विचारणा केली असता त्यांच्याकडे लेखी तक्रार करत सर्व कागदपत्रे दिली.
डॉ. नि. तु. पाटील यांनी सदर वाढीव बील अर्जाचा पाठपुरावा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांच्याकडे सुरु केला.शिवाय या रुग्णालयाबद्दल लेखा परीक्षण अहवाल यांच्या प्रती माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागवण्यात आल्या होत्या. मागील वर्षभरात तब्बल तीन वेळा वाढीव बिलसंबंधी लेखा परीक्षण अहवाल तयार करण्यात आले. याबाबत भुसावळ तालुक्याचे आ.संजय सावकारे यांना पण अवगत करत त्यांनी पण आक्षेप निवारण समिती जळगाव यांच्याशी चर्चा करत बिल पडताळणी बद्दल सुचविले.
सरतेशेवटी चौधरी दाम्पत्याला रु.४७,०००/- आणि रु.४५,३००/- या रकमेचे दोन चेक़ परत करण्यात आले. अर्थात अतिरिक्त आकारणी करण्यात आलेल्या ९२ हजार रूपयांचा रिफंड त्यांना मिळाला असून याबद्दल चौधरी परिवाराने भारतीय जनता पार्टी संचलित करोना योद्धा सहाय्य समितीचे आभार मानले आहे.
या संदर्भात कोरोना योध्दा सहाय्य समितीचे अध्यक्ष डॉ. नि. तु. पाटील म्हणाले की,महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत ज्यांनी करोना उपचार घेतले,तसेच रुग्णांकडून बिल देखील वसूल केले,याबद्दल सर्व माहिती आता प्राप्त होणार असून अश्या रुग्णांना त्यांची रक्कम लेखा परीक्षण झाल्यावर परत मिळणार आहे. किंबहुना काही ठिकाणी सुरवात झाली आहे.तरी याबद्दल काही तक्रार असल्यास योद्धा सहाय्य समितीच्या कोणत्याही सदस्याशी संपर्क साधावा. भारतीय जनता पार्टी आ.संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही डॉ. नि. तु. पाटील यांनी दिली आहे.