भुसावळ प्रतिनिधी । येथील सर्वोदय छात्रालयात कोणताही सुरक्षा रक्षक नेमला नसल्याची माहिती देत या संदर्भात संतोष चौधरी यांनी दिलेली माहिती चुकीची असून यासाठी त्यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी प्रमोद सावकारे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
सर्वोदय छात्रालयातील वादाप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या विरूध्द नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या जामीनावर उद्या दिनांक २४ रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील अनेक कंगोरे आता समोर येत असल्याचे दिसून येत आहे. संतोष चौधरी यांनी आपण सर्वोदय छात्रालयातील सुरक्षा रक्षकाच्या मदतीसाठी गेलो असल्याचे पोलीस जबाबात नोंदविले आहे. तर आता त्यांच्या या दाव्याला छात्रालयाचे अध्यक्ष प्रमोद सावकारे व सचिव रामदास सावकारे यांनी आव्हान दिले आहे.
अंतरिम जामिनानंतर संतोष चौधरींनी या ठिकाणावरुन सुरक्षारक्षक कैलास शिरसाठ याने फोन करुन बोलावल्याने आपण तेथे गेलो, असे म्हटले. मात्र, संस्थेने कोणताही सुरक्षारक्षक ठेवलेला नाही. यामुळे कैलास शिरसाठ यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करावा. तसेच चौधरी यांच्या मोबाईल कॉलचे डिटेल्स काढावे, अशी मागणी अध्यक्ष प्रमोद सावकारे, सचिव रामदास सावकारे यांनी बाजारपेठ पोलिसांकडे केली आहे.