अनिल चौधरी बच्चू कडूंच्या भेटीला; ‘प्रहार जनशक्ती’त प्रवेशाची शक्यता

भुसावळ प्रतिनिधी । येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या भेटीला गेले असून ते त्यांच्या ‘प्रहार जनशक्ती’ या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता यामुळे बळावली आहे.

अनिल चौधरी यांनी आपली राजकीय कारकिर्द शिवसेनेतून सुरू केली होती. यानंतर ते दीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २०१०च्या अखेरीस झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देखील दिली होती. मात्र यात ते पराभूत झाले होते. यानंतर ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचे ते विश्‍वासू सहकारी म्हणून मानले जात होते. २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल चौधरी यांनी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. यातही ते पराभूत झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून अनिल चौधरी हे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा होती. आगामी नगरपालिका निवडणुकीत ते भुसावळात शिवसेनेचे नेतृत्व करतील अशी चर्चा देखील रंगली होती. मात्र आज त्यांनी आकस्मीकपणे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. ते अमरावती येथे बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यासाठी बसले आहेत. यानंतर ते ‘प्रहार जनशक्ती’ पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

अनिल चौधरी हे अमरावती येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत असून त्यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र याबाबत ते लवकरच अधिकृत घोषणा करू शकतात.

Protected Content