वरणगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वरणगाव येथे सध्या होणारा विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलन केले.
या संदर्भातील वृत्त असे की, वरणगाव शहरामध्ये पाण्याची समस्या उदभवली आहे. सध्या १२ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. कठोरा जॅकवेलवर होणारे भारनियमन हेच उशिराने होणार्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे जॅकवेलवरील लोडशेडिंग बंद करा मागणीसाठी सोमवारी भाजपने आंदोलन केले.
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजप शहराध्यक्ष सुनील माळी, भाजयुमोचे आकाश निमकर, महिला आघाडीच्या प्रणिता पाटील यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला. याप्रसंगी मुख्याधिकार्यांना निवेदन देऊन पाणी समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.