जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महिला व बालकांच्या सशक्तीकरणासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी 3 टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. जळगाव जिल्हा प्रशासकीय कार्यात नेहमीच आग्रेसर राहिला आहे. आता आम्ही प्रशासनाच्या बळकटीकरणावर विशेष लक्ष दिले असून आता महिला व बालविकासासाठी इमारत उभी राहणार आहे.महिला व बाल विकास भवन नूतन इमारतीच्या माध्यमातून केंद्र व शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे. सामाजिक कार्य, राजकारण, प्रशासन, खेळासह प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबरीने कार्य करीत आहेत. त्यामुळे स्त्री शक्ती पुरुषांपेक्षा कुठेही मागे नाही. सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. या महिलांचा आम्हाला अभिमान असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज नाट्यागृहा शेजारील आवारातील महिला व बाल विकास भवनच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा नियोजन अधिकारीविजय शिंदे, जिल्हा व महिला बाल कल्याण अधिकारी डॉ. वनिता सोनगत, जि प चे महिला बाल कल्याण अधिकारी राऊत, सा. बां. चे उप अभियंता गिरीश सूर्यवंशी, शाखा अभियंता पी. बी. महाजन, बचत गट, सहयोगिनी, अंगणवाडी सेविका, समुदेषण केंद्राच्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा देतांना पालकमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र ही कर्तृत्वान महिलांची भूमी राहिली असून महिला सुरक्षा, महिला सशक्तीकरण, स्वावलंबन व स्त्रियांचा सन्मान ही महाराष्ट्राची ओळख आहे. महिला कुटुंबात विविध जबाबदाऱ्यांसह कामांच्या ठिकाणी विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळतात. त्यामागे त्यांचा त्याग असतो. सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत या महिलांचा आम्हाला अभिमान असून महिलांच्या सबळीकरणासाठी विविध योजना राबवण्यात शासन म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत.
शासन नेहमीच महिलांच्या कल्याणाला प्राथमिकता देत आहे. आता जिल्हा नियोजन मधून तीन टक्के रक्कम केवळ महिला आणि बाल कल्याणासाठी दिली जाणार असून यातून स्त्रियांच्या प्रगतीसाठी अनेक गोष्टी करता येतील. त्यात महिला व बाल विकास भवन ही त्याची सुरुवात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा व महिला बाल कल्याण अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी महिला व बाल विकास भवन चे महत्व सांगून सविस्तरपणे माहिती विषद केली. सूत्रसंचालन परीविक्षा अधिकारी सारिका मेटकर यांनी केले तर आभार सा.बा.चे उप अभियंता गिरीश सूर्यवंशी यांनी मानले.