बीएचआरचा अवसायक व वसुली अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बीएचआर पतसंस्थेचा अवसायक चैतन्य नासरे यांच्यासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाखांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, बीएचआर मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमधील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात गाजले असून यात संचालक मंडळ कारागृहात असून नंतर देखील अनेकांनी यात घोळ केलेला आहे. यातच आता थेट पतसंस्थेचे अवसायक चैतन्य नासरे यांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराची आई आणि मोठा भाऊ यांनी बीएचआरमधून कर्ज घेतलेले होते. याची ‘वन टाईम सेटलमेंट’ करण्यासाठी त्यांनी बीएचआरचे अवसायक चैतन्य नासरे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांची वसुली अधिकारी सुनील पाटील यांच्याशी भेट झाली. त्यांनी या प्रकरणात दीड लाख रूपयांची लाच मागितली. चैतन्य नासरे यांनी देखील हे पैसे सुनील पाटील यांच्याकडे देण्याचे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी संबंधीतांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तेथील पथकाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी अवसायक चैतन्य हरीभाऊ नासरे व वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील या दोघांना बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. रात्री उशीरा त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content