मंदाताई खडसेंना दिलासा : आता १४ मार्च रोजी होणार सुनावणी

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भोसरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून या प्रकरणी आता १४ मार्चला सुनावणी होणार आहे.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा मिळाला आहे. याआधी कोर्टाने तूर्तास अटक न करण्याचे ईडीला निर्देश दिले होते. तसेच तपास यंत्रणेला या तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही खडसेंनी देण्यात आले. यानंतर आज पुन्हा मुंबई हायकोर्टाने अंतरीम जामीनात वाढ केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्च रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण ?

तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद करण्यात आली असून एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडनं आलेला पैसा वापरल्यचा आरोप ईडीने केला आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. आजदेखील ते अटकेत आहेत. तर एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला आहे. तर मंदाकिनी खडसे यांना देखील १४ मार्चपर्यंत दिलासा मिळालेला आहे.

Protected Content