जळगाव प्रतिनिधी | भोपाळमध्ये नकली नोटा छापणाऱ्या रॅकेटचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचलेले आहेत. भोपाळमधील आरोपीला ताब्यात घेऊन जळगाव जिल्ह्यात काही संबंध असल्याचा रॅकेटचा भोपाळ पोलिसांनी पर्दाफाश केला. शुक्रवारी त्यांनी जळगावातून दोघांना ताब्यात घेत १ लाख ४० हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या. वसीम उर्फ विकी (रा. भोपाळ), सद्दाम सिराज कुरेशी (रा. भोपाळ) व भूपेंद्र सुपडू पाटील (रा. पाचोरा) अशी भोपाळ येथील रातीबड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
रातीबड पोलिसांनी वसीम याच्याकडून नकली नोटा जप्त केल्या होत्या. त्याची चौकशी केल्यानंतर नकली नोटांचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहोचलेले असल्याचे भोपाळ पोलिसांना स्पष्ट झाले. वसीम याला घेऊन भोपाळ येथील पोलिस उपनिरीक्षक पंकज कुशवाह, एसआय कर्मवीर सिंह, रोहित पंथी व राजेश पाल यांचे पथक गेल्या दोन दिवसांपासून जळगाव शहरात दाखल झालेले आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नकली नोटा छापणाऱ्या रॅकेटमधील संशयित जळगाव शहरात राहत असल्याचे वसीम याने सांगितले. संशयिताचे मोबाइल लोकेशन पिंप्राळा येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सद्दाम कुरेशी याला पिंप्राळ्यातून तर पाचोरा येथून भूपेंद्र सुपडू पाटील याला ताब्यात घेतले. संशयिताकडून नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तिघांनाही पथकाने रामानंदनगर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून नकली नोटा एकूण १ लाख ४० हजार रुपयांच्या असल्याचे आढळून आले. नकली नोटा छापणारे मोठे रॅकेट असून त्याच्या मास्टरमाइंडचा भोपाळ पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, पथकाने तिन्ही संशयितांना शुक्रवारी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर करून त्यांची रिमांड घेतले.