बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या विश्वासाची असलेली प्रथा म्हणजे ‘भेंडवळची घट मांडणी’ आज सायंकाळी होणार आहे. उद्या सकाळी भाकित जारी केलं जाईल. भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य आणि राजकारणाविषयी वर्षभराचा अंदाज वर्तवला जात असून राज्यातील शेतकऱ्यांचे भेंडवळच्या भाकिताकडे लक्ष लागलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्र व विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या सुप्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी ३ मे रोजी संध्याकाळी होणार आहे तर उद्या 4 मे रोजी सकाळी या घटमांडणीची भाकीत जाहीर केली जाणार आहे. पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या गावी घट्ट मांडण्याची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षापासून सुरू आहे. घटमांडणीची परंपरा सुरू करणारे चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज भविष्यवाणी जाहीर करतात.
अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर आणि करडी अशा १८ प्रकारची धान्ये ठेवण्यात येतात तर मध्यभागी ४ मातीचे ढेकळे ठेऊन त्यावर पाण्याने भरलेली घागर असते.
घागरीवर पानसुपारी पुरी पापड चांडोली खुर्द भजे वडे खाद्य पदार्थ ठेवले जातात. रात्रभर या ठिकाणी कोणीही जात नाही, दुसऱ्या दिवशी पहाटे घटामध्ये झालेल्या बदलावरून आणि घटाच्या आतील धान्याचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविले जाते. त्यावरून पिकास आणि पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. कोणत्या महिन्यात पाऊस जास्त कोणत्या महिन्यात पाऊस कमी सांगितलं आहे.
शेतकरी यंदा कोणती पिके घ्यायची हे ठरवत असतात चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली परंपरा पुंजाजी महाराज यांनी आजही कायम ठेवली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा गावातील हनुमान मंदिराच्या पारावर पूर्वी मांडणी केली जाते. या दोन्ही मांडणीमध्ये साम्य असते त्यामुळे या दोन्ही मांडणीचे निष्कर्ष एकत्र जोडून वर्तवली जातात.