एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील भालगाव येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दिवसभर विविध कार्यक्रमांचे नियोजनही केले आहे.
तालुक्यातील भालगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांच्या मंदिरास प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी 12 जुलै रोजी एकादशी निमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे 15 वर्षापासून आषाढी एकादशीला या ठिकाणी भव्य यात्रा भरते. दरवर्षी सुमारे चाळीस गावातील पायी दिंड्या याठिकाणी येतात. अनेक भाविकांना पंढरपूर जाणे शक्य होत नसल्याने ते भालगाव येथे येऊन श्री विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत असतात. यावर्षी याप्रमाणे पहाटे मंदिरात महापूजा व आरती होणार आहे. त्यानंतर प्रवचन व भजन होईल. सायंकाळी 6 रोजीला गावातून पालखी मिरवणूक काढण्यात येईल. तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज मराठे यांच्यातर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री 9 वाजता सी.एच.पाटील महाराज यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थांचे अध्यक्ष देविदास मराठे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.