शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तीपीठनंतर भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाच्या कामाला स्थगिती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारचा महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात शक्तीपीठ,भक्तिपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तीनही महामार्गांच्या भूसंपादनाला सुरूवात झाली आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन थांबवले होते. आता सरकारने भक्तिपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे भूसंपादनाला ब्रेक लावला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन सरकार कोणताही महामार्ग लादणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते, त्यानुसार आता सरकारने तिन्ही महामार्गांचे भूमिअधिगृहण थांबवलं आहे.

समृद्दी महामार्गानंतर शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात होता. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग उभारण्यात येणार होते. राज्याची दळणवळण व्यवस्था मजबूत व सुलभ करण्यासाठी हे प्रकल्प मोठी भूमिका बजावणार होते. मात्र आता या तिन्ही महामार्गाचं काम थांबवण्यात आलं आहे. नागपूर-गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ महामार्ग होणार होता. या तीन महामार्गांसाठी जवळपास सव्वालाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणार होती.

महामार्गाच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्याने एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीन महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने सरकारला माघार घ्यावी लागली आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील २७ हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती. मात्र याला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा विरोध होता. यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Protected Content