मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाने पंजाबमध्ये पूर्ण ताकद लाऊनही तेथे दारूण पराभव का झाला यावर देखील या पक्षाच्या नेत्यांनी भाष्य करावे असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तर त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना कालच्या निकालावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, भाजपाला मोठा विजय मिळाला आहे. उत्तर प्रदेश त्यांचंच राज्य होतं, पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष ४२ वरुन १२५ वर पोहोचला असून जागा तिप्पट वाढल्या आहेत. भाजपाच्या विजयात ओवैसी, मायावतींचं योगदान आहे हे मान्य करावं लागेल. त्यामुळे त्यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावा लागेल, असा सल्ला देखील खासदार संजय राऊत यांनी दिला.
राऊत पुढे म्हणाले की, पंजाबसारख्या सीमावर्ती भागात तेथील लोकांनी राष्ट्रीय आणि प्रखर राष्ट्रवादी पक्ष भाजपाला पूर्णपणे नाकारलं. प्रधानमंत्री, गृहमंत्री, रक्षामंत्री सर्वांनी झोकून प्रचार केला तरी ते का हारले? उत्तर प्रदेश तर तुमचंचं होतं, उत्तराखंडही तुमचंच होतं, गोवाही तुमचं होतं. उत्तर प्रदेशमध्ये किती जागा मिळाल्या म्हणून आम्हाला बोलत आहात ना. तिथे कॉंग्रेस आणि शिवसेनेचा जो पराभव झाला आहे त्यापेक्षा मोठा पराभव तुमचा पंजाबमध्ये झाला आहे. त्याबद्दल देशाला मार्गदर्शन करा, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
तसेच राज्यांच्या निवडणुकीचा आणि मुंबई पालिकेचा काही संबंध नाही. गेली ५० वर्ष आम्ही पालिका लढत असून पालिकेवर भगवाच झेंडा कायम राहील, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.