भैय्याजी जोशींच्या मराठी विरोधी वक्तव्याने वाद पेटला

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “घाटकोपरमध्ये गुजराती भाषा जास्त बोलली जाते आणि मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता येणे आवश्यक नाही.” या विधानामुळे राज्यभरात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भैय्याजी जोशी यांचे हे म्हणणे आहे की, मुंबईत कोणीही कोणतीही भाषा बोलू शकतो, कारण मुंबईला स्वत:ची भाषाच नाही. मग ते तामिळनाडूत जाऊन चेन्नईबद्दल असं बोलू शकतील का? किंवा बंगळुरू, लुधियाना, पाटणा, लखनऊ येथे जाऊन हे बोलतील का? मराठी ही आमची राजभाषा आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्य म्हणजे राजद्रोहच आहे.”

दरम्यान, भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “भैय्याजी जोशी हे आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून चुकीचा अर्थ लावला जात आहे. त्यांचा हेतू समजून न घेता काही लोक त्यावरून टोकाची टीका करत आहेत. भैय्याजी जोशी यांचा अर्थ असा होता की, घाटकोपरच्या काही भागात गुजराती भाषिक लोकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे तिथे गुजराती बोलले जाते. पण मुंबईची भाषा कालही मराठी होती, आजही मराठी आहे आणि भविष्यातही मराठीच राहील. जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत मुंबईची भाषा मराठीच असेल.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य अद्याप ऐकलेले नाही. ते ऐकूनच मी त्यावर बोलणार आहे. पण मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे आणि समजले पाहिजे. इतर भाषांचाही आम्ही सन्मान करतो, कोणत्याही भाषेचा अपमान आम्ही करणार नाही. जो आपल्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसऱ्यांच्या भाषेचा आदर करू शकतो.” या प्रकरणामुळे मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Protected Content