Home Cities जळगाव ‘भगवान महावीर जन्म कल्याणक’ महोत्सव : विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘भगवान महावीर जन्म कल्याणक’ महोत्सव : विविध कार्यक्रमांचे आयोजन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “अहिंसा परमो धर्म”चा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक निमित्त आज मंगळवार, ३१ मार्च रोजी जळगाव शहरात जैन समाज बांधवांच्या वतीने प्रचंड उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खानदेश मिल परिसरामध्ये आयोजित या महोत्सवात हजारो समाज बांधव सहभागी झाले होते.

भव्य शोभायात्रा आणि दर्शनासाठी गर्दी :
सकाळच्या सत्रात भगवान महावीर यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. फुलांनी सजवलेला रथ आणि प्रभू महावीरांच्या जयघोषाने जळगावची बाजारपेठ आणि मुख्य रस्ते दुमदुमून गेले होते. पारंपारिक वेशभूषेतील समाज बांधव आणि महिलांच्या सहभागाने या शोभायात्रेची शोभा अधिकच वाढली होती.

मान्यवरांची उपस्थिती :
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही खानदेश मिल परिसरामध्ये ‘तीर्थंकर प्रभू श्री महावीर स्वामी कल्याणक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी आमदार मनीष जैन, माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. प्रभू महावीरांच्या विचारांनीच समाजाची प्रगती होईल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

आरोग्य आणि रक्तदान शिबिराचा उपक्रम :
केवळ धार्मिक कार्यक्रमच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत याप्रसंगी भव्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला तरुण आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “जीवावर प्रेम करा” हा महावीरांचा संदेश आचरणात आणत मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करण्यात आले. दिवसभर चाललेल्या या विविध कार्यक्रमांमुळे खानदेश मिल परिसर भक्तिमय झाला होता.


Protected Content

Play sound