भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर उलटून मृत्यूमुखी पडलेल्या तिन्ही तरूणांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या आप्तांनी वाळू वाहतुकदाराने भरपाईसाठी ठिय्या मांडला. मात्र अखेर मध्यस्थीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, भडगाव-कोटली रोडवर बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाळू उपसा करण्यासाठी जाणारे ट्रॅक्टर पलटी होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सुरेश अशोक शिंदे (वय २७, रा. टोणगाव), रवी सुरेश शिंदे (वय २५), मयूर भोई (वय २१, रा.आझाद चौक, भडगाव) यांचा समावेश आहे. या तिघांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतांच्या नातलगांनी व शहरातील विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालय गाठले. याप्रसंगी मृतांच्या वारसांना भरपाई मिळावी, या मागणीसाठी तहसीलदारांच्या दालनासमोर अर्धातास ठिय्या मांडला. न्याय मिळेपर्यंत मृतांचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमीका मृताच्या नातेवाईकांनी घेतली होती. अखेर अधिकार्यांनी मृतांच्या नातेवाईकांची समजूत काढली. यामुळे अखेर या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, याच अपघातामध्ये शामराव शिंदे (वय २३), आकाश रामकृष्ण पवार (वय २१), कैलास पवार (वय २१, रा. सर्व टोणगाव) हे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.