भडगाव-धनराज पाटील | तालुक्यातील कजगाव येथे भर दिवसा बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसल्याची घटना आज घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, कजगाव येथे आज भर दिवसा दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. शहरातल्या सराफ बाजारात दुकान असणारे उमेश बोरा हे दुकानात असतांना दोन बंदुकधारी दुकानात शिरले व त्यांनी आपल्या जवळील बंदूक बोरा यांच्यावर रोखून दुकानातील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. तथापि, बोरा यांनी तात्काळ आरडा-ओरडा केला. यामुळे दरोडेखोरांनी क्षणार्धात दुकानातून काढता पाय घेत पलायन केले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणताही ऐवज लुटण्यात आलेला नसून कुणाला इजा देखील झाली नाही. तथापि, भर दिवसा अशा प्रकारचे धाडस केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. कजगाव येथे मोठी बाजारपेठ असून अशा प्रकारे भर दिवसा दरोड्याचा प्रयत्न पहिल्यांदाच झाल्याने व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह भडगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, गुन्हेशाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार विलास पाटील, सचिन वाबडे, पो.ना नरेंद्र विसपुते, स्वप्निल चव्हाण, कैलास पाटील, विनोद पाटील, नरेंद्र शिंदे, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील आदींची उपस्थिती होती. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.