भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गिरणा नदीपात्रात वाळू तस्करांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली असून यात ४ ट्रॅक्टर, २ जेसीबी आणि १ डंपरसह सुमारे ८३ लक्ष २४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
गिरणा नदी पात्रातुन सर्रास अवैध रित्या वाळुचा उपसा करत वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची खातरजमा करुन नदी पात्रात छापा टाकला असता गिरणा नदीत परमेश्वर राजपुत ( वय ४२ रा. महिंदळे), प्रदिप पाटील (वय ३४, रा वडदे ); ज्ञानेश्वर सोनवणे (वय २७ रा कोठली), राहुल महाजन वय-२७ हे वाळु भरताना मिळून आले. त्यांच्या जवळ वाळूने भरलेले ४ ट्रक्टर, २ जेसीबी,१ डंपर मिळवुन आले.
या कारवाईमध्ये संबंधीत वाहने ताब्यात घेवुन वरील ४ जणा विरुध्द पोलीस नाईक भगवान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पोलीस स्टेशनला गु.र.नं २०६/२०२३ भादवि कलम ३७९,१०९, ३४ व खाण व खनिज अधिनियम १९५७ चे कलम २१(१), २१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाहीत एकुण ८३ लाख २४ हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली आहे. या पथकात सपोनि सागर ढिकले, पोना राजेंद्र निकम, कॉन्स्टेबल महेश अरविंद बागुल, विश्वास सुधाकर देवरे, श्रीराम विठ्ठल कांगणे, राहुल राजेंद्र महाजन, समाधान पोपट पाटील, आशुतोष सोनवणे, रविंद्र निवा बच्छे, नंदकिशोर शिवराम महाजन, पवन कृष्णा पाटील, विकास पाटील, भगवान पाटील यांच्यासह अधिकारी व अंमलदार सहभागी होते.
यापुढे देखील अशा प्रकारची अवैध वाळु चोरी विरुध्द धडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा मानस अभयसिंह देशमुख यांनी व्यक्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.