मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्याच्या डिजिटल युगात तंत्रज्ञान प्रगतीच्या शिखरावर असले तरी, त्याचसोबत ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. नुकतीच अशीच एक घटना चंदीगडमध्ये घडली, जिथे वर्क फ्रॉम होमच्या नावे एका महिलेची 5.69 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. चंदीगडमधील 27 वर्षीय महिलेला व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. स्वतःला ‘स्नेहा वर्मा’ असे ओळख देणाऱ्या व्यक्तीने महिलेला इंस्टाग्राम व्हिडीओ लाईक करून पैसे कमावण्याची संधी असल्याचे सांगितले. काम सोपे आणि आकर्षक वाटल्याने महिलेला स्वारस्य निर्माण झाले.
प्रथम, महिलेला काही सोपी कामे देण्यात आली आणि तिच्या अकाऊंटवर बनावट कमाई दाखवण्यात आली. आत्मविश्वास वाढल्यानंतर स्कॅमर्सनी तिला गुंतवणुकीचे आमिष दाखवले. महिलेला सांगण्यात आले की अधिक पैसे गुंतवल्यास जास्त नफा मिळेल. महिलेने टप्प्याटप्प्याने 5.69 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. मात्र, जेव्हा तिने पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला आणखी 5 लाख रुपये गुंतवण्यास सांगण्यात आले. संशय आल्यावर तिने कुटुंबीयांना माहिती दिली आणि तक्रार दाखल केली.
फसवणुकीपासून वाचण्यासाठी हे लक्षात ठेवा
अनोळखी नंबरवरून मिळणाऱ्या सहज कमाईच्या ऑफर्सवर विश्वास ठेवू नका.
कोणत्याही नोकरीच्या ऑफरची आधी सत्यता पडताळा.
तुमची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, ओटीपी कुणाशीही शेअर करू नका.
व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर येणाऱ्या नोकरीच्या ऑफर्सकडे सतर्कतेने पाहा.
फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही संशयास्पद ऑफरवर त्वरित सायबर क्राईम पोलिसांशी संपर्क साधावा.