कोलकत्ता (वृत्तसंस्था) शारदा चिटफंड घोटाळ्यात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करण्यास सीबीआयला मनाई करणारा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन दिवसांपासून सुरू असलेले आपले धरणे आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी बोलताना ममतांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत सुप्रीम कोर्टाने आज सकारात्मक निर्णय दिला असून पुढच्या आढवड्यात आम्ही आमची बाजू पुन्हा एकदा मांडणार आहोत, असे ममता म्हणाल्या. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आपले आंदोलन मागे घेतले त्यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे उपस्थितीत होते.
यासोबतच ममता बॅनर्जी यांची विरोधकांसोबत फोनवर चर्चाही झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलन मागे घेण्याची घोषणा करत असताना ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, ‘हे धरणे आंदोलन राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे आपण धरणे आंदोलन थांबवत आहोत. न्यायालयाने आज सकारात्मक निर्णय दिला. पुढील आठवड्यात दिल्लीत हा मुद्दा आम्ही पुन्हा उपस्थित करु’. मिळालेल्या माहितीनुसार, 13, 14 फेबुवारीला दिल्लीत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला राज्यासहित सर्व यंत्रणांवर आपलं नियंत्र ठेवायचं असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा देऊन पुन्हा गुजरातला परतावं. तिथे एक व्यक्ती एक ससकार आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी रविवारी कोलकाता येथे पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमला स्थानिक पोलिसांनीच ताब्यात घेतले होते व नंतर या टीमला सोडण्यात आले होते. या नाट्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राविरुद्ध रणशिंग फुंकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा सूडाचे राजकारण खेळत आहेत, असा आरोप करत ममतांनी थेट धरणे आंदोलन सुरू केले होते.