Home उद्योग बीड-अहिल्यानगर रेल्वे प्रवासाची सुरुवात; 15 स्थानकांसह फक्त 10 रुपयांतही होणार सफर!

बीड-अहिल्यानगर रेल्वे प्रवासाची सुरुवात; 15 स्थानकांसह फक्त 10 रुपयांतही होणार सफर!

0
265

बीड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणाऱ्या बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर आज पहिली रेल्वे धावली. नवे बीड रेल्वे स्थानक जनतेच्या उपस्थितीत आणि मोठ्या राजकीय सोहळ्याच्या साक्षीने सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या लोकोउद्घाटनाचा उत्सव साजरा करण्यात आला. व्यासपीठावरून बीडकरांच्या संघर्षाला दाद देण्यात आली आणि अनेकांनी श्रेयवादाच्या फैरी झाडल्या.

बीड ते अहिल्यानगर हा पहिल्या टप्प्याचा प्रवास आजपासून सुरू झाला असून 167 किमी लांबीच्या या मार्गावर एकूण 15 रेल्वे स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात बीड ते अहिल्यानगरपर्यंत डेमू रेल्वे सुरू करण्यात आली आहे. बीडहून सकाळी 6.55 वाजता गाडी क्रमांक 71441 निघून दुपारी 12.30 वाजता बीडला पोहोचेल. तर दुपारी 1 वाजता गाडी क्रमांक 71442 परतीसाठी रवाना होईल आणि संध्याकाळी 6.30 वाजता अहिल्यानगरला पोहोचेल. आठवड्यात सहा दिवस ही रेल्वे सेवा सुरू राहणार आहे.

प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या मार्गावरचे तिकीट दर अत्यंत किफायतशीर ठेवण्यात आले आहेत. बीड ते अहिल्यानगर प्रवासासाठी केवळ ₹40 आणि नजीकच्या स्थानकांसाठी किमान ₹10 इतके तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. बीडपासून पहिलं स्थानक असलेले राजुरी नवगण येथे केवळ ₹10 तिकिटात जाता येणार आहे. या मार्गावरील सरासरी वेग 30 किमी प्रती तास असल्याने पूर्ण प्रवासास साधारणतः 5 तास 30 मिनिटे लागणार आहेत.

नवीन बीड रेल्वे स्थानक हे बीड शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर पालवण गावात उभारण्यात आले आहे. मात्र, रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना खासगी वाहन किंवा रिक्षाचा वापर करावा लागणार आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, रिक्षा भाडे ₹150 ते ₹200 पर्यंत आकारले जाऊ शकते, ज्यामुळे रेल्वे प्रवास सुलभ असला तरी स्थानकापर्यंत पोहोचणे काहीसा खर्चिक ठरण्याची शक्यता आहे.

बीड-अहिल्यानगर-परळी हा संपूर्ण रेल्वेमार्ग 261 किमीचा असून आजपासून केवळ बीड-अहिल्यानगर हा 166 किमीचा टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. बीड-परळी टप्प्याचे काम अद्याप सुरू आहे. एकूणच, बीड जिल्ह्यासाठी ही रेल्वे सेवा म्हणजे विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, या सेवेचा ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना फायदा होणार आहे.


Protected Content

Play sound