सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस उपनिरिक्षकास मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सावदा शहरातील बडा आखाडा परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याबाबतची माहिती सावदा पोलिसांना कळताच पोलिसांनी धाव घेतली. याप्रसंगी हाणामारी करणार्या चौघांनी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली. हा प्रकार बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडला.
पोलिस कर्मचारी मोहसीन खान शब्बीर खान पठाण यांच्या फिर्यादीनुसार शेख साबीर उर्फ बडा बाबू शेख मंजूर, शेख गुलाब शेख मंजू (दोन्ही रा.बडा आखाडा, सावदा), रीतेश संतोष पाटील, उल्हास कडू पाटील (सावदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शेख साबीर उर्फ बडा बाबू शेख मंजूर, उल्हास कडू पाटील यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.