जळगाव प्रतिनिधी । ‘मला पाहून का हसला’ या संशयावरून मुलासह त्याच्या आईला चौघांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वडली येथे सोमवारी १५ मार्च रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय जहांगीर सोनवणे (वय- 50) रा.वडली ता.जि.जळगाव हे शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 15 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कामावरून घरी आले. त्यावेळेस त्यांचा मुलगा गणेश सोनवणे हा बाजूला राहणाऱ्या अंकुश जनार्दन सोनवणे यांच्या घराच्या ओट्यावर बसला होता. गणेश हा आमच्याकडे पाहून का हसला या कारणावरून संशयावरून अंकुश सोनवणे, किरण जनार्दन सोनवणे, आशाबाई जनार्दन सोनवणे आणि उज्वला बाळू सोनवणे सर्व रा. वडली यांनी गणेश याच्या डोक्यात काठीने वार करून गंभीर जखमी केले. तर इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संजय सोनवणे यांच्या पत्नी ताराबाई यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली. संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे.