जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरांच्या बाजूला सुरू केलेला गुरांचा गोठा बंद करावा या कारणावरून एका महिलेला ५ जणांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी नगरात घडला आहे. या घटनेबाबत चौकशी अंती अखेर शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरी नगरात शोभा आनंदा पाटील या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांच्याच घराच्या शेजारी पत्राच्या शेडमध्ये गुरांचा गोठा आहे. या गोठ्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढल्यामुळे हा गोठा बंद करावा, अशी मागणी शोभा पाटील यांनी केली होती. दरम्यान याचा राग आल्याने गुरांचा गोठ्याचे मालक रेखाबाई पाटील, बेबाबाई पाटील, प्रवीण मुकुंदा पाटील, निलेश किशोर पाटील आणि कविता किशोर पाटील यांनी चापटाबुक्क्यांनी शोभा पाटील या महिलेला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून नुकसान झाले. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घडला. याप्रकरणी चौकशी अंती अखेर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मारहाण करणारे रेखाबाई पाटील, बेबाबाई पाटील, प्रवीण मुकुंदा पाटील, निलेश किशोर पाटील आणि कविता किशोर पाटील या पाचही जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.