तीन लाखासाठी विवाहितेला मारहाण; पतीसह चार जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील कांचननगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला तीन लाखासाठी शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या तिच्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचननगरातील उज्ज्वल चौकातील छाया यांचा वरणगाव येथील धनराज सोपान कोळी यांच्याशी विवाह झाला आहे.  लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर पतीसह सासरच्यांनी विवाहिता छाया हिच्याकडे माहेरून तीन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. याच कारणावरून वेळोवेळी सासरच्यांनी तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शारीरिक तसेच मानसिक छळ केला. तसेच आमच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुला तसेच तुझ्या आईवडिलांना जिवे ठार मारण्याची धमकीही छाया हिस सासरच्यांनी दिली. छळ असह्य झाल्याने छाया कोळी या कांचननगरातील माहेरी आल्या. या प्रकरणी छाया धनराज कोळी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती धनराज सोपान कोळी (वय ३६), सासरे सोपान वना कोळी (वय-५५),  सासू पुष्पा सोपान कोळी (वय -५०) तिन्ही रा. जगदंबानगर वरणगाव व दीर कृष्णा सोपान कोळी (वय-३३) या चार जणांविरुध्द सोमवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना भावसार ह्या करीत आहेत.

Protected Content