Home आंतरराष्ट्रीय फलंदाजाचे एका षटकात पाच षटकार ; गोलंदाजाच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू

फलंदाजाचे एका षटकात पाच षटकार ; गोलंदाजाच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू

0
152

कोलंबो – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा।  आशिया चषक 2025 मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. अफगाणिस्तानचा आक्रमक फलंदाज मोहम्मद नबी याने एका षटकात सलग 5 षटकार ठोकत मैदानावर धुमाकूळ घातला. मात्र या क्षणातच श्रीलंकेचा युवा गोलंदाज दुनिथ वेल्लालगे याचे वडील सामना पाहताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावले. ही घटना श्रीलंकेतील कँडी शहरात घडली असून, संपूर्ण क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

सामना 18 सप्टेंबर रोजी झाला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या. शेवटच्या काही षटकांत अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने जबरदस्त फटकेबाजी करत केवळ 22 चेंडूत 60 धावा फटकावल्या. यामध्ये त्याने 6 षटकार आणि 3 चौकार लगावत सामना रंगतदार केला. नबीने वेल्लालगेच्या डावातील शेवटच्या षटकात एकट्याने 32 धावा घेतल्या, ज्यामध्ये सलग 5 षटकारांचा समावेश होता.

हा प्रसंग दुनिथ वेल्लालगे यांचे वडील घरात टीव्हीवर सामना पाहताना अनुभवत होते. आपल्या मुलावर होणारी ही धुलाई पाहून त्यांना तीव्र मानसिक धक्का बसला आणि त्याच क्षणी त्यांना हार्ट अटॅक आला. तत्काळ वैद्यकीय मदत मिळवूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. ही बातमी मिळताच वेल्लालगे आणि संपूर्ण श्रीलंकन संघ हळहळून गेला. मोहम्मद नबीलाही ही बातमी कळल्यावर काही वेळ तो स्तब्ध झाला.

विशेष म्हणजे, श्रीलंकेने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकला आणि सुपर-4 फेरीत आपले स्थान निश्चित केले. विजयाच्या क्षणीही वेल्लालगे आपल्या वडिलांच्या दुःखद निधनामुळे टीमपासून दूर होता. कुसल मेंडिसने नाबाद 74 धावांची खेळी करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला.

ही घटना केवळ क्रिकेटमधील एक अनपेक्षित वळण ठरली नसून, खेळाच्या मानसिक दडपणाचा परिणाम किती गंभीर ठरू शकतो, याचे हे दुःखद उदाहरण आहे. दुनिथ वेल्लालगे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर ही वेळ कठीण असून, सर्व स्तरांतून त्यांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.


Protected Content

Play sound