चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकेच्या ग्राहकांचे पैसे खात्यात जमा न करता परस्पर स्वत:जवळ ठेवून बँकेच्या ३२ ग्राहकांना सुमारे ६२ लाख ६१ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे. त्याच्यावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश युवराज शिंदे रा. बिलखेडा ता. चाळीसगाव असे फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, ‘सुदर्शन साहेबराव पाटील रा. देवळी ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते मोटार खरेदी-विक्री करण्याचे काम करतात. त्यांचे देवळी येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बँक खाते आहे. बँकेच्या शाखेत बँक मित्र म्हणून निलेश युवराज शिंदे हा काम पाहतो. दरम्यान, सुदर्शन पाटील यांनी ३० जुन २०२१ रोजी सकाळी सुदर्शन पाटील हे त्यांच्या बँकेच्या खात्या १० लाख रूपये भरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याठिकाणी निलेश शिंदे हा तिथे आला. त्याने सांगितले की तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात भरायचे आहे का. असे सांगितल्यावर सुदर्शन पाटील यांनी हो सांगितले.
त्यानुसार १० लाख रूपयांची रोकड निलेशकडे दिल्यानंतर पावती सायंकाळी देतो असे सांगीतले. त्यानुसार सायंकाळी निलेशने सुदर्शन यांना पैसे भरल्याची पावती दिली. त्यानंतर आठ दिवसानंतर सुदर्शन पाटील यांना कळाले की, निलेशने बँक खात्यात पैसे भरले नाही. याबाबत निलेशला पैशांबाबत विचारणा केली असता आपण शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे भरले असे सांगितले व १ महिन्यात सर्व पैसे देतो अशी ग्वाही दिली. दरम्यान, त्याने दिलेल्या चेक देखील बाऊंन्स झाला आणि सुदर्शन पाटील सारख्या ३२ बँकेच्या ग्राहकांची सुमारे एकुण ६२ लाख ६१ हजार ८९१ रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. यासंदर्भात सुदर्शन पाटील यांनी मेहूणबारे पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ५ मार्च रोजी संशयित आरोपी निलेश युवराज शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून निलेश शिंदे हा फरार होता.’
दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहुणबारे पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी निलेश शिंदे याला बुधवारी अटक केली. ही कारवाईक मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सपोनि विष्णू आव्हाड, सपोनि चव्हाण, पो.कॉ. मिलींद शिंदे, गोरख चकोर, शैलेश माळी यांनी कारवाई केली.