इंदूर वृत्तसंस्था । इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत-बांगलादेशमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल याने आज खणखणीत शतक ठोकले आहे. मयांकचा कसोटी कारकिर्दीतील हा आठवा सामना असून तिसरे शतक आहे. त्याच्या शतकांच्या बळावर भारताने आतापर्यंत ३०० धावांचा टप्पा पार केला आहे.
पहिल्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या १५० धावांत आटोपला होता. त्यास प्रत्युत्तर देताना भारतानं आतापर्यंत सव्वा दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. त्यात मयांकच्या शतकी खेळीचा मोठा वाटा आहे. सलामीला आलेल्या मयांकला ३२ धावांवर असताना जीवदान मिळालं. स्लिपमध्ये उडालेला त्याचा झेल इम्रूलनं सोडला. या संधीचा फायदा उठवत मयांकनं बहारदार खेळ केला आणि १८३ धावांत शतक पूर्ण केलं. त्यात १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये मयांकनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्यानं ७६ व ४२ धावांची खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या गड्यासाठी त्यानं ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली होती. हा सामना भारतानं १३७ धावांनी जिंकला होता. आठ सामन्यांतील १२ डावांत मिळून त्यानं ६० पेक्षाही अधिक सरासरीसह ७००च्या वर धावा केल्या आहेत. त्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. आजच्या शतकामुळं कमीत कमी डावांत तीन शतकं ठोकणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा, सुनील गावसकर, लोकेश राहुल यांनी ही कामगिरी केली आहे.