मुंबई, वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘आदित्य संवाद’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश’ यात्रा सुरू झाली असतांना आता शिवसेनेचे सचिव आणि ‘होम मिनिस्टर’ फेम ‘भाऊजी’ आदेश बांदेकर यांची उद्यापासून ‘माऊली संवाद’ यात्रा सुरू होणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लोकांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी आणि समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने ‘माऊली संवाद यात्रा’ सुरू करण्याचे ठरवले आहे. सचिव असलेल्या आदेश बांदेकर यांच्या खांद्यावर सेनेने ही जबाबदारी टाकली असून ते माऊली संवादामार्फत राज्यातील महिलांशी संवाद साधणार आहेत. उद्या २ ऑगस्टपासून या माऊली संवादाला सुरुवात होणार आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी भागाची यासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २ ऑगस्टला पालघर तर तीन ऑगस्टला भिवंडीत जाऊन आदेश बांदेकर माऊली संवादातून महिलांशी संवाद साधणार आहेत. ४ ऑगस्टला बीड या ठिकाणी माऊली संवाद यात्रा पोहोचणार आहे. या ठिकाणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे माऊली संवादमध्ये सहभागी होतील, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.