जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आणि परिवर्तन जळगाव निर्मित ‘बंदे में हे दम’ हा संगीतमय कार्यक्रम उद्या, २९ जानेवारी रोजी महात्मा गांधी उद्यान येथे संध्याकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा आणि त्यांच्या कार्याचा शोध घेणारा आहे. महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकत, त्यांच्याविषयी असलेल्या समज-गैरसमज यांचे निरसन करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन महात्मा गांधी यांच्या विचारांना समर्पित असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. त्याच अनुषंगाने पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची असून, दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. संगीत दिग्दर्शन मंजूषा भिडे यांनी केले आहे. वेशभूषेसाठी प्रतिक्षा कल्पराज, रंगभूषेसाठी लिलिमा जैन आणि बिना मल्हारा यांचे योगदान आहे. या कार्यक्रमाच्या निर्मितीचे प्रमुख विनोद पाटील आणि वसंत गायकवाड असून, सूत्रसंचालन हर्षल पाटील करतील. या कार्यक्रमात नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. गोविंद मोकासी, श्रद्धा कुलकर्णी, सुदिप्ता सरकार, अंजली धुमाड, वरुण नेवे, योगेश पाटील, राहुल कासार, अक्षय दुसाने, रोहित बोरसे, मानसी आसोदेकर, जयश्री पाटील, वंदना नेमाडे आणि पियूषा नेवे हे कलाकार आपल्या सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवतील.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, नागरिकांनी या संगीतमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन व परिवर्तन जळगावतर्फे करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांना समर्पित हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.