Home क्राईम घरफोडीतील ‘बंदर’ आणि ‘काल्या’ जेरबंद!; एलसीबीची कारवाई

घरफोडीतील ‘बंदर’ आणि ‘काल्या’ जेरबंद!; एलसीबीची कारवाई

0
172

जळगाव लाइ्रव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील एका बंद घरातून ४९ हजार ६०० रुपयांची रोकड आणि ऐवज चोरून नेणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कासमवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, अटक केलेले दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुप्रीम कॉलनीतील रहिवासी शरीफ मुराद खाटीक हे १३ डिसेंबर रोजी एका लग्नसमारंभासाठी चाळीसगाव येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. श्री. खाटीक परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

घरफोडीचा गुन्हा दाखल होताच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर, ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार शकील शेख ताजुद्दीन शेख उर्फ बंदर (रा. कासमवाडी) आणि साहिल शहा सद्दाम शहा उर्फ काल्या (रा. तांबापूरा) या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तातडीने सापळा रचला. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने रविवारी (१४ डिसेंबर) दुपारी ३ वाजता कासमवाडी परिसरातून या दोन्ही चोरट्यांना अटक केली. अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत असून, त्यांच्यावर यापूर्वीही घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.


Protected Content

Play sound