
ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा सहावा भाग.

संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी संशोधन पद्धती निश्चित केल्यानंतर संशोधनाचा विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ यातील प्रत्येक संकल्पनेचा अर्थ समजावून घेत त्यानुसार पुढील कार्य करणे सुरु झाले. प्रकरण आणि त्यातील मुद्दे गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर निश्चित करू देत होते. संशोधनाचा विषय केळी उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित होता. केळी उत्पादक शेतकरी शेतीच्या नवतंत्राची माहिती घेण्यासाठी बहुमाध्यमे वापरतात हे विषयात मान्य केले होते. त्यामुळे बहुमाध्यमे म्हणजे काय आणि त्यांचा कृषी क्षेत्रात वापर कसा तसेच केळी उत्पादकांसाठीची नेमकी उपयुक्तता काय ? या दोन प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे आवश्यक होते. त्यामुळे संशोधन कार्यातील पुढील अभ्यास हा बहुमाध्यमांशी संबंधित होता.

माध्यम क्षेत्रात प्रामुख्याने पारंपारिक आणि नवमाध्यमे असे प्रकार मानले जातात. पारंपारिक माध्यमांमध्ये वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, नाट्य, पथनाट्य, रंगमांचावरील दृश्यकला, सिनेमा, माहितीपट, रेडिओ, टीव्हीवरील वाहिन्या यांचा समावेश होतो. गरजेनुसार फलक, पत्रके, पुस्तिका अशा माध्यमांचा वापर होतो. नवमाध्यमांमध्ये इंटरनेट व संगणक प्रणालीशी संबंधित माध्यमांचा वापर होतो. यात इंटरनेटशी संबधित प्रणालीतून अंक – अक्षर – चित्र – छायाचित्र किंवा चित्रफित यांची देवाण – घेवाण शक्य होते. माध्यम क्षेत्रांशी संबंधित वेबसाईट, बेब – न्यूज पोर्टल किंवा व्हिडीओ पोर्टल याच प्रकारात असतात. सध्या जगभरात सर्वाधिक प्रचलित सोशल मीडिया प्रकारात जनसंवादाची माध्यमे जसे – फेसबूक, युट्यूब, एक्स, व्हाट्स अॅप यांचा समावेश असतो.

सर्वच माध्यमांचे मूळ कार्य किंवा त्यांची गरज ही संदेश – आशयाचे प्रसारण करणे, माहिती देणे, शिक्षण देणे किंवा मनोरंजन करणे हेच असते. माध्यमांचे स्वरूप त्यांच्या दृश्य स्वरुपांच्या तंत्राशी संबंंधित असते. माध्यमे छापील स्वरूपात, दृश्य (स्थिर वा चल चित्रण) स्वरूपात, ध्वनी स्वरुपात असतात. आशयाचे घटक अंक, अक्षर, शब्द, चित्र, छायाचित्र, अर्कचित्र, व्यंगचित्र, आलेख, नकाशा, रंग, आकार, चिन्ह, चलचित्र अशा स्वरूपात असते. माध्यमांची निर्मिती करण्यासाठी तंत्रानुसार निर्मिती करणारी (माध्यम), निर्मिती केलेले माध्यम पोहचविणारी (मध्यस्थ), माध्यमांचा स्विकार करून त्याचा वापर करणारी (वाचक – प्रेक्षक – श्रोता) अशा तीन व्यवस्था आवश्यक असतात. कोणत्याही माध्यमांची निर्मिती, देवाण – घेवाणसाठी पोहच यंत्रणा आणि त्यानंतर माध्यम वापरकर्त्यांचा प्रतिसाद या क्रियेतून माध्यमांचा प्रभाव आणि उपयुक्तता लक्षात येते.
बहुमाध्यमांचा अभ्यास करताना प्रथम पारंपारिक लोककलांचा अभ्यास केला. जेव्हा कोणतेही माध्यम नव्हते तेव्हा लोकजीवनात रंजनातून संदेश देण्यासाठी मेळे, पथनाट्ये, तमाशा, नौटंकी यांचा वापर केला गेला. त्यात वाद्ये, संगीत, संवाद, अभिनय याचा समावेश असे. यानंतर महत्त्वाचे माध्यम म्हणून वृत्तपत्रांचा इतिहास व आजचे रूप याची सविस्तर माहिती घ्यावी लागली. वृत्तपत्रांचे प्रकार, त्यांचे स्वरूप हे समजावून घेतले. वृत्तपत्रात कृषी विषयक आशयाचे प्रमाण किती असते याचा आढावा काही अभ्यास अहवालांमधून घेतला. केळी लागवड संबंधित आशयाचे प्रसारण कोणत्या वृत्तपत्रांमधून होते हे जाणून घेतले.

अलिकडच्या वेबपोर्टलवरील वृत्तपत्रांचाही अभ्यास केला. अशाच पद्धतीने रेडिओ माध्यमाचा इतिहास व सद्यस्थितीची माहिती करून घेतली. रेडिओवरून कृषी आशय प्रसारणाची माहिती घेतली. नवमाध्यम म्हणून एफएम आणि कम्युिनटी रेडिओची सुद्धा माहिती घेतली. रेडिओनंतर चित्रपट माध्यमांचा इतिहास व आजचे स्वरूप जाणून घेतले. कृषी विषयावर आधारलेल्या चित्रपटांची माहिती घेतली.
कृषी क्षेत्रासाठी सर्वाधिक प्रभावी ठरणारे दूरचित्रवाणी (टीव्ही) या माध्यमाचाही इतिहास व सद्यस्थिती याबद्दल सविस्तर माहिती घेतली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांमुळे शेतीशी संबंधित नवतंत्रांचा झपाट्याने विस्तार होत गेला याची माहिती काही अभ्यास अहवालांमधून समोर आली. विविध भाषांमधील दूरचित्रवाणीचे प्रसारण जसे वाढत गेले त्यानुसार दूरचित्रवाणीवरील कृषी कार्यक्रमांमुळे शेतकरी वर्गाला थेट माहिती मिळणे, प्रात्यक्षिके पाहणे या सुविधा मिळत गेल्या. केळी लागवड करणारे शेतकरीही सतत दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहून नवतंत्राची माहिती मिळवित असतात हे लक्षात आले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन भाग १ : शिक्षण आणि नोकरीशी संबंधित अनुभवांचा प्रवास !
मध्यंतरी संगणक प्रणालीचा वापर सुरू झाला. संगणकाच्या सोबत इंटरनेट सेवेचा विस्तार होत गेल्यामुळे माध्यमांचे रुप – स्वरूप – गती यात बदल झाला. काही माध्यमे सुटसुटीत झाली. संगणकाच्या सोबतीने लॅपटाॅप, टॅब अशी व्यक्तीगत वापराची यंत्रे आली. माहितीचे आदान – प्रदान गतीने होत गेले. हीच प्रमाणली नंतर पारंपारिक माध्यमांमध्ये वापरणे सुरु झाले. जुन्या सर्वच माध्यमांचे रूप बदलले. त्यांची गती व पोहच वाढली. पूर्वी काही तासांच्या अंतराने माध्यमांमधून माहिती मिळत असे. वृत्तपत्रातून १२ तासांनी, रेडीओवर ४ तासांनी, टीव्हीवर दर तासांनी माहिती उपलब्ध होत असे. माध्यमे बदलत गेली आणि त्यांच्या प्रसारणाचे तंत्र गतीमान झाले, त्यामुळे सर्वच माध्यमातून २४ तास, दर मििनटाला, सेकंदाला माहिती मिळणे शक्य झाले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता
पूर्वी दूरचित्रवाणीच्या एखाद्या चॅनेलवर कार्यक्रमाचे लाईव्ह (चलत्) प्रसारण करायचे असेल तर ओबी व्हॅन व खर्चिक कॅमेरे वापरावे लागत. आता काळ बदललला. तंत्रज्ञान सहज – सोपे वापरण्यासारखे झाले. मोबाईलमध्ये उपलब्ध अॅपच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून थेट चॅनेलच्या स्टुडिओत लाईव्ह प्रसारण करणे शक्य झाले आहे. त्यामुळे माध्यमे २४ तास माहिती प्रसारणाचा प्रवाह झाले. आताचा सोशल मीडिया हा माहितीचा अखंड वाहणारा प्रवाह आहे. प्रत्येक सेकंदाला नवी माहिती मिळते आणि प्रत्येक सेकंदाला माहिती जुनी होते. या सर्व विषयांचा अभ्यास बारकाव्याने करावा लागला.
विविध माध्यमांनी, अभ्यासकांनी केलेले सर्वेक्षण वा अभ्यास अहवाल याची आकडेवारी – सांख्यिकी माहिती, निष्कर्ष, तथ्ये याचा सविस्तर तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातही कृषी क्षेत्रातील आशयाच्या संदेशांचे – माहितीचे प्रसारण – प्रचार कसा केला जातो, त्याचा शेतकरी वर्गावर कसा प्रभाव पडतो, शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो ? याचा सतत आढावा घेतला. केळी लागवड संदर्भात जळगाव जिल्हा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमधील माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की, विविध माध्यमांतून मिळेल्या माहितीची वापर, कृषी विषयक नवतंत्राच्या माहितीचा वापर शेतकरी शेतात करीत आहेत. तसे केल्यांतर त्यांच्या पिकांच्या उत्पादनात आणि हातात येणाऱ्या उत्पन्नात वाढ होत आहे. ज्या – ज्या अहवालांमधून पूरक – उपयुक्त माहिती मिळाली, त्याचे क्रमशः संकलन – लेख केले. त्यामुळे संशोधन कार्याला निश्चित गती मिळाली.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ !
बहुमाध्यमांचा प्रभाव वाचक – श्रोता – प्रेक्षक यांच्यावर कसा पडतो, या संदर्भात माहिती घेत असताना लक्षात आले की, बहुमाध्यमांचे आशय प्रचार – प्रसारणात वर्चस्व आहे. सर्वच क्षेत्रांत बहुमाध्यमे वापरली जात असून मेसेज क्रिएशन, मेसेज सेण्डर, मेसेज मीडियम, मेसेज रिसिव्हर, मेसेज रिपाॅन्स अशा नव्या संकल्पना तयार झालेल्या आहेत. सोशल मीडिया प्रकारात तर प्रत्येक नागरिक हा मेसेज क्रिएटर – सेण्डर – रिसिव्हर आणि रिस्पाॅण्डर असल्याचे लक्षात आले. यातूनच सिटीजन जर्नालिस्ट, इच मॅन इज कण्टेण्ट क्रिएटर अशा नव्या संकल्पना तयार झाल्या. सोशल मीडियासाठी टेक्निकल मीडियम (तांत्रिक माध्यम) मोबाईल असल्यामुळे माध्यमांमधील आशयाचा प्रवास सात दिवस गुणीले प्रत्येक सेकंद सुरु असल्याचे लक्षात आले. बहुमाध्यमांचा हा प्रवाह दिवसेंदिवस गतीमान होत आहे. पूर्वी मोबाईलच्या माध्यमातील संदेश वहन ‘टू जी’ प्रकारात होते. आताचा काळ फाईव्ह जी, सिक्स्थ जी कडे जाणारा आहे. या सर्व तांत्रिक व्यवस्थांची सविस्तर माहिती घेतली.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ४ – संशोधन म्हणजे काय ?
सोशल मीडियात कृषी विषयक आशयांची देवाण – घेवाण हा स्वतंत्र विषय असून जगभरासह भारतात अशा आशयाला स्वीकारणारा व त्यात सहभागी होऊ प्रतिसाद देणारा वर्ग शेतकरी सुद्धा आहे हे ठळकपणे समोर आले. बहुमाध्यमांचा वापर प्रामुख्याने उद्याेग, व्यापार, व्यवसाय, धंदा, शिक्षण, प्रशिक्षण, लोकशिक्षण, घरात – खासगी संस्थेत आणि सार्वजिक ठिकाणी होत असल्याचे दिसून आले. केळी उत्पादक शेतकरी बहुमाध्यमे वापरून नवतंत्राची माहिती घेतात असे काही अभ्यास अहवाल समोर आले. बहुमाध्यमांच्या वापरासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यासोबत अनेक खासगी संस्था – यंत्रणा प्रयत्न करतात, प्रोत्साहन देतात असेही समोर आले. सरकारी – खासगी संस्थांनी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी विविध मोबाईल अॅप, वेब पोर्टल तयार केल्याचे दिसून आले. शेतकरी वर्ग त्यांच्या गरजेनुसार त्या माध्यमांचा वापर करीत असल्याचे सांख्यिकी तपशिलातून दिसून आले. शेतकरी वर्ग युट्यब आणि फेसबूक सोबत व्हाट्स अॅपचा २४ तास वापर करीत असल्याचे आढळून आले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ५ – संशोधन पद्धती निश्चित करणे !
मी स्वतः मराठी वृत्तपत्रांंमध्ये गेली ३२ वर्षे पत्रकारिता करीत असल्यामुळे आणि पत्रकारितेतील बदलणारी सर्व तंत्रे आत्मसात केलेली असल्यामुळे बहुमाध्यमांच्या अभ्यास करणे मला सोपे गेले. माध्यमांच्या प्रभाव – प्रचार – प्रसाराचे सविस्तर विश्लेषण करणे शक्य झाले. कृषी क्षेत्रात बहुमाध्यमांमधील फेसबूक, व्हाट्स अॅप व युट्यूब या सोशल मीडियाच्या प्रभावाचा नेमका अंदाज ठरविता आला. सोशल मीडियाचा अभ्यास करीत असताना सर्वच क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे समोर आले. मात्र संशोधन कार्य करण्याच्या कालावधीत शेतीच्या माहिती निर्मिती व प्रसारणात ‘एआय’ चा प्रभावी वापर होत असल्याचे उदाहरण समोर आले नाही.
(पुढील भाग – शेतीचे नवतंत्रज्ञान आणि वापर…)



