धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी बु. येथील सरपंच सुरेखा शिवदास पाटील यांचेवर नऊ पैकी सात सदस्यांनी विविध कारणांवरून अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबत येथील तहसीलदारांनी सोमवारी (दि.२५) सकाळी ११.०० वा. बांभोरी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले आहे. यावेळी सदर प्रस्तावावर मतदान होणार आहे.
सुरेखा पाटील दि.२५/०४/२०१६ पासून सरपंच पदावर निवडून आल्या आहेत. त्या ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर कामे करणे, पाणी टंचाई असून सुद्धा पाणी टंचाई बाबत असमर्थता दर्शविणे, सुरेखा पाटील या सरपंच पदावर असतांना त्यांचा कारभार त्यांचे पती शिवदास रामदास पाटील हे पाहतात त्यामुळे नियमांचे उल्लंघन होते या कारणास्तव हा विश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तरी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३५ अन्वये अविशावासाची कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यात संजय दगा पाटील, विक्रम झुलाल पाटील, प्रमोद श्रीराम जगताप, भिवा ओंकार भिल, मंदाबाई प्रकाश पाटील, मनीषा संतोष सोनवणे यांनी मागणी केली आहे. सोमवारी सकाळी ११ वा. बांभोरी बु.ग्रामपंचायत येथे विशेष सभेचे आयोजन केले असून, सदर प्रस्तावावर त्यावेळी मतदान होईल, त्यात सरपंचांचे भवितव्य ठरणार आहे.