जळगाव– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कानळदा येथे महर्षी कनवाश्रम, गिरणा नदीच्या काठावर आज ऋषिपंचमी निमित्ताने महिलांनी भक्तिभावाने पवित्र स्नान व पूजा केली. या धार्मिक सोहळ्यासाठी कानळदा परिसरात मोठ्या प्रमाणात महिला भाविकांनी उपस्थिती लावली. गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून कानळदा ग्रामपंचायतीने महिलांच्या सुरक्षेसाठी अभिनव उपक्रम राबवत ‘बालस्नेही पंचायत’ पथक तैनात केले.
गावाचे सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या या पथकात स्थानिक किशोरी व तरुणींचा समावेश करण्यात आला असून, त्यांना विशेष गणवेश देऊन दिवसभर भाविक महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली. पोलीस प्रशासन आणि होमगार्ड यांच्यासोबत समन्वय साधत हे पथक परिसरात सतत गस्त घालत होते.

या उपक्रमामुळे महिलांना एक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळाले. पथकाच्या उपस्थितीमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, सामाजिक पातळीवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी स्थानिकांनीही उचलल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले.
सरपंच पुंडलिक सपकाळे यांनी सांगितले की, “गावातीलच मुलींना या पथकात सहभागी करून घेऊन आम्ही महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक नवा प्रयोग केला आहे. यामुळे संस्कृती, सुरक्षा आणि सामूहिक जबाबदारी यांचा संगम घडतो.”
पथकातील काही सदस्यांनी लाईव्ह ट्रेंड्सशी बोलताना सांगितले की, “आम्हाला या उपक्रमाचा भाग होण्याचा अभिमान आहे. गावातील महिलांसाठी आपण काहीतरी चांगले करत असल्याची जाणीव आम्हाला समाधान देते.”



