जळगाव प्रतिनिधी । वाळू वाहतुकदाराकडून सव्वा लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप यांना न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.
याबाबत वृत्त असे की, वाळू वाहतुकदाराचे जप्त दोन ट्रक सोडण्यासाठी बाळू चाटे नामक पंटरामार्फत सव्वा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जळगावच्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले होते. थेट प्रांताधिकार्यांवरील या ट्रॅपमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रांताधिकारी दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप यांना आज न्यायालयात सादर करण्यात आले. न्या. डी. ए. देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर दोघेही तपासात सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे तपास अधिकार्यांनी सांगितले. दरम्यान, कोविड महामारी च्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार न्या.देशपांडे यांनी प्रांताधिकारी दीपमाला चौरे व लिपिक अतुल सानप दोघांना सोमवार बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर वैयक्तिक जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.
न्यायालयात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.