जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील अनेक भागात मूलभूत सुविधा व रस्ते नसल्याने नागरिकांची व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे, या विविध समस्या सोडवाव्या या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टी जळगाव शहरच्या वतीने आज गुरुवार १२ सप्टेंबर रोजी महापालिकेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन आयुक्त सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षात सत्ताधारी व विरोधक हे आलटून-पालटून महापालिका सत्तेत येत असतात. जो पक्ष सत्तेत असतो तो सत्तेवर असताना नागरिकांच्या सुविधांकडे साफ दुर्लक्ष करते. हा लपंडाव जळगावकर महापालिका स्थापन आल्यापासून पाहत आहे. त्याप्रमाणे जळगाव महापालिका आयुक्त व प्रशासनातील अधिकारी यांनीही जनतेचे काहीच सोयरसुतक राहिलेला नाही, सत्ताधारीपक्ष, विरोधीपक्ष, महापौर आयुक्त व प्रशासनाच्या निषेधार्थ आज बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने महापालिकेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टीच्या मागण्या याप्रमाणे आहेत.
जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे अनेक अपघात होत असून महापालिकेने रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी, सध्या पावसाचे दिवस असल्या कारणामुळे शहरात डेंग्यू व मलेरिया यासह अनेक आजाराने नागरिक हैराण झाले आहेत, डेंग्यू व मलेरिया रोग निर्मूलनासाठी महापालिका प्रशासनाने अद्याप कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नाही. त्यामुळे यावर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात. जळगाव शहरात अनेक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत यात स्टेशन रोड, तांबापुर, सिव्हिल हॉस्पीटल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, फुले मार्केटमधील महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा, नेरी नाक्यावरील अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मिरज मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच आर.आर. विद्यालयाजवळील गाडगेबाबा पुतळा या सर्व पुतळ्यांचे संरक्षण व सुशोभीकरणासाठी महापालिकेच्यावतीने दुर्लक्ष झालेले असून तातडीने सुशोभिकरण करण्यात यावे, शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे ते तातडीने पूर्ण करून हा रस्ता नागरिकांसाठी तात्काळ खुला करावा, जळगावात स्वतःचे घरातले सदस्य राहात असूनही त्यांना भाडेकरू असल्याचा नोटिसा महापालिकेने देऊन नागरिकांची होऊ घातलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशा प्रलंबित मागण्यांसाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शहराध्यक्ष इरफान शेख, कार्याध्यक्ष अलीम शेख, जिल्हाध्यक्ष पराग कोचुरे, जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, पवन नेमाडे, रहीम तांबोडी, रियाज शेख, महिला आघाडीच्या अनिता पेंढारकर, दिपाली पेंढारकर, सुलतान शेख, सुकलाल पेंढारकर, शुभम अहिरे, विनोद आढागळे, रहीम शेख, देवानंद निकम, मोहसीन मणियार, सुनील देहाडे, सुमित्र अहिरे, संगीता देहाडे, प्रदीप बावस्कर, किशोर पवार, प्रवीण साबळे, शुभम सपकाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.