कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात त्रिवेणी व्यवसाय शिखर परिषदेचे आयोजन

NMU 1

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ जानेवारी रोजी त्रिवेणी व्यवसाय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितिन गडकरी या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत.

नवउद्योजक, संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या साठी या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नि‍तीन गडकरी यांची नुकतीच भेट घेऊन या परिषदेच्या उदघाटनाचे निमंत्रण दिले आहे. ना. गडकरी यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून या उपक्रमाचे कौतूक केले. यावेळी कुलगुरुसमंवेत व्य.प.सदस्य दिलीप पाटील, प्रा. भुषण चौधरी, सॅटर्डे क्लबचे छबीराज राणे, विनीत जोशी उपस्थित होते.

बदलत्या काळात विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यापीठाने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात इन्क्युबेशन सेंटरचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने या सेंटरसाठी मदत जाहीर केलेली आहे. उद्योजक घडावे या साठी विद्यापीठाने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्याशी करार केला असून विविध कार्यक्रम त्यांच्या सहकार्याने आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग त्रिवेणी व्यवसाय शिखर परिषद जानेवारीत होत आहे. स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत उद्योजक, कारखानदार, मॅनेजमेंट कन्सल्टंट, बॅकर्स, सी.ए., सरकारी विभागांचे प्रतिनिधी, उद्योजक संघटना आदींच्या प्रतिनिधींना निमंत्रीत करण्यात आले आहे. यामघ्ये बीटूबी मिक्सर नेटवर्कीग, उद्योग आणि तंत्रज्ञान, बँका आणि वित्तपुरवठा, जीएसटीचे परिणाम, स्टार्टअप आदी विषयांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील चारशे उद्योजक यात सहभागी होण्याची शक्यता आहे. उद्योजक होऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. असा विश्वास कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी व्यक्त केला.

Protected Content