कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या प्रश्नावर संतप्त बदलापूरकरांनी मंगळवारी शाळेच्या गेटवर धाव घेत जोरदार आंदोलन केले. त्याचबरोबर रेल रोको आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. कोल्हापूरमधील तपोवनमध्ये आज गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केला.
बदलापूरमध्ये घटना दुर्दवी आहे, पण या विषयावर बदलापूरमध्ये झालेले आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेला बदनाम करण्यासाठीच बदलापुरात रेल रोको आंदोलन करण्यात आले असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ‘लाडक्या बहिणींना आधार देण्याचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये बहिणी स्वत: उपस्थित राहतात. ही योजना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी आहे. या योजनेला कसा खोडा घालायचा, ही योजना कशी बदनाम करायची, याबाबतीत सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. काही बोलायचे, खोटं बोलायचे, रेटून बोलायचे ही युक्ती विरोधकांनी अवलंबली आहे, त्यांना सडेतोड उत्तर माझ्या लाडक्या बहिणी देतील, ‘ असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
जे आंदोलन बदलापूरमध्ये झाले, तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बॅनर आले. त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या योजनेला परिणाम करण्यासाठी रेल रोको केले. रेल रोको करुन सात- आठ तास लोकांना वेठीस धरणे हे कोणते राजकारण आहे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.