मुंबई, वृत्तसंस्था | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक झाले असून राजभवनावर मोर्चा आयोजित केला आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. मात्र राजभवनावर पोहोचण्याआधीच नरिमन पॉईंट येथे हा मोर्चा अडवण्यात आला असून बच्चू कडू यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याआधी पोलिसांनी बच्चू कडू यांनी मोर्चा आयोजित करण्यासाठीची परवानगी नाकारली होती. यानंतरही बच्चू कडू यांनी आपण मोर्चा काढणारच असल्याचे सांगितले होते. यामुळे पोलिसांनी नरिमन पॉईंट येथेच बच्चू कडू यांचा समर्थकांसबोतचा मोर्चा अडवला आणि ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच आंदोलकांनी पोलिसांची गाडीच अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यांच्या मोर्चाला परवानगी देण्यास नकार दिला होता. यासंबंधी बच्चू कडू यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. यानंतर नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी आपण पुढच्या वेळी आंदोलन करताना काहीही न सांगता थेट पोहोचू असा इशाराच दिला. सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणार नाही का ? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी अटकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून त्यांनी आधीच माहिती दिली होती, असे म्हटले आहे. राज्यपालांकडे काही हक्कच नसतील तर त्यांनी सुत्रे हातात कशाला घ्यायची ? त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाही का ? राज्यपालांनी फक्त राजभवनात बसून राहायचे का ? ते काय स्वर्गातून आले आहेत का ? त्यांना राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहणे गरजेचे आहे असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.