नवी दिल्ली । दंगल गर्ल बबीता फोगट हिने आपल्या विवाहात सात नव्हे तर आठ फेरे घेऊन ‘बेटी बचाओ…बेटी पढाओ’चा संदेश दिला असून याबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे.
दंगल गर्ल म्हणून ख्यात असणारी महिला मल्ल बबिता फोगट ही गत रविवारी विवाहबद्ध झाली. भारत केसरी विजेता पैलवान विवेक सुहागसोबत तिने लग्नगाठ बांधली. आपल्या विवाह सोहळ्यात तिने सात ऐवजी आठ फेरे घेऊन उपस्थितांना चकीत केले. यातील आठवे फेरे हे बेटी बचाओच्या संदेशासाठी घेण्यात आल्याचे या नवविवाहीत दाम्पत्याने सांगितले. बबिता आणि विवेक हे पाच वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असून त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी जून महिन्यात त्यांचा विवाह निश्चित केला. हरयाणातील बलाली या गावी बबिता आणि विवेक यांचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि अतिशय साधेपणाने पार पडला. या लग्नात फक्त २१ वर्हाडी उपस्थित होते. तर कन्यादान हे फक्त एक रूपया घेऊन पार पडले. या विवाहात बबीताने घेतलेली अष्टपदी ही चर्चेचा विषय बनली आहे.