पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सामनेर येथील सर्वोदय बहुउद्देशीय संस्था आपल्या क्षमतेनुसार व लोकसहभागातून वृक्ष लागवड, संवर्धन व पर्यावरण जागृतीसाठी अथक प्रयत्न करत आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी संस्था सतत नवनवीन संकल्पनांवर आधारित पर्यावरण जागृती करत असते. संस्थेने ग्रीन क्रिएशन इनिशिएटिव्ह अंतर्गत नेहमीच “बर्थडे ट्री” या संकल्पनेने विविध शाळा आणि तरुणांचे प्रबोधन केले आहे.
सामनेर येथील महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक वृंद तसेच सर्वच विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिंनी यात नेहमीच सहभाग नोंदवतात. नुकताच सातवीत शिकणाऱ्या कु. प्रेरणा राजेंद्र शिरसाठ या निसर्गप्रेमी कन्येचा वाढदिवस तिच्या मैत्रिणींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने शाळेच्या प्रांगणात औदुंबरचे झाड लावून तिला वाढदीवसानिमित पर्यावरणपूरक शुभेच्छा दिल्या आहेत. यातून सद्य स्थितीत वाढदिवसाला जे अवास्तव रूप दिल जात त्याला या निसर्ग कन्यांनी छेद दिल्याचं प्रकर्षाने जाणवते. याच शाळेच्या प्रांगणात संस्थेने वाढदिवसाचे झाड, स्वातंत्र्य दिनी झाड, महापुरुषांना अभिवादन म्हणून झाड, शहीद वृक्ष, यशाचे झाड, अभिनंदनाच झाड, अशा स्वरूपाच्या विविध संकल्पना साकारत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडच नव्हे तर त्याचे जतन व संवर्धन केले आहे. सर्व झाड १० ते १५ फुटाचे वाढून विद्यालयाच्या निसर्ग सौंदर्यात भर घालत आहेत. संस्थेच्या या पर्यावरण यज्ञात सातत्याने अनेक हात जोडले जात असून हरित निर्माणचा एक शाश्वत आयाम तयार झाला आहे. विद्यार्थ्याच्या सहभागातून पर्यावरणाचा आदर्श संस्कार निर्माण झाल्याचे गावकुसातून वरिष्ठांकरवी नेहमीच संस्थेच्या उपक्रमास दाद दिली जाते. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांचा संस्थेच्या “हरित निर्माण” उपक्रमास नेहमीच हातभार लाभत असल्याने संस्थेचे तज्ञ संचालक प्रा. राजेंद्र साळुंखे, चंद्रकांत साळुंखे व अध्यक्ष नरेंद्र पाटील, हरितदूत शिवराज पाटील यास सकारात्मक पाठींबा देतात.