जळगाव प्रतिनिधी । कोरोना महामारी थांबविण्यासाठी समाजातील अनेक घटक प्रयत्न करीत आहेत. यातच एक २९ वर्षीय तरुण थेट कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून जळगावात कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी आलेला आहे. या तरुणाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठातांची भेट घेत हाती घेतलेल्या अभियानाबद्दल माहिती दिली.
नितीन गणपत नांगनूरकर असे या समाजजागृती करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो चंदगड तालुक्यात आमरोली या गावचा रहिवासी आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांनी या सायकल यात्रेला सुरुवात केली. कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव अशा आठ जिल्ह्यातून नितीन नांगनूरकर यांनी सायकलवर यात्रा पूर्ण केली आहे. शुक्रवारी शासकीय रुग्णालयात सायकलवर बॅनर लावून तसेच कोरोनाविरुद्धचे हस्तपत्रक वाटप करीत त्यांनी जनजागृती केली. ‘मी जबाबदार’ ‘मीच माझा रक्षक’ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या घोषवाक्यानुसार त्यांनी कोरोना महामारीपासून कसा बचाव करावा याबाबत रुग्णालय परिसरातील नागरिकांना माहिती दिली. त्यांचा पुढील प्रवास मुंबई आहे.
यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्या जनजागृती मोहिमेबाबत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी माहिती जाणून घेतली. जनजागृतीसाठी स्वतःचा वेळ, श्रम देणे महत्वाचे कार्य आहे असे सांगून अधिष्ठाता यांनी नितीन नांगनूरकर याना पुढील प्रवासासाठी सदिच्छा दिल्या.