एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल नगरपालिकेने प्लास्टिक विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. प्लास्टिक बंदीबाबत नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी, यासाठी शहरातून नुकतीच प्लास्टिक पिशवीची अंत्ययात्रा काढण्यात आली.
तसेच नगरपालिकेकडून प्लास्टिक पिशवीमुळे होणाऱ्या पर्यावरण नुकसानीचे भविष्यात आपलेच नुकसान होईल, याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या अंत्ययात्रेत रा.ती.काबरे विद्यालय व अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेच्या विद्यार्थी व शिक्षक सहभागी होऊन प्लास्टिक बंदीबाबत विविध घोषवाक्य तयार करून घोषणा देण्यात आल्या. सदर प्लास्टिक पिशवीची अंत्ययात्रेस भगवा चौकातून सुरूवात होऊन मेन रोड, बुधवार दरवाजा, तहसील कार्यालय, रा.ती.काबरे विद्यालय मार्गे आंबेडकर चौक, महात्मा फुले पुतळा व संपूर्ण शहरातून काढण्यात आली.
या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष रामेशसिंग परदेशी, मुख्याधिकारी विकास नवाळे, एरंडोल न.पा.चे विद्यमान सर्व नगरसेवक, न.पा.कर्मचारी वर्ग हजर होते. तदनंतर एरंडोल फिल्टर प्लांट येथे कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले व नगराध्यक्ष परदेशी यांच्या हस्ते वृक्ष प्रेमी, पर्यावरण प्रेमी, वृक्ष संगोपन कर्ते यांना प्रदूषण दूत म्हणून सन्मानित करण्यात आले.