जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डिजीटल तंत्रज्ञानाच्या वाढलेल्या वापरामुळे सायबर सुरक्षितेबाबत जागरुकता केल्यास गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे मत प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी सायबर सुरक्षितता आणि जागरुकता या विषयावरील कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळा आणि क्विक हिल फौडेशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.२१ सप्टेंबर रोजी ही कार्यशाळा विद्यापीठात आयोजित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जळगाव सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक दीगंबर थोरात, क्विक हिल फौंडेशन चे महेश भरडी, महाराष्ट्र पोलिसचे सचिन सोनवणे व दिलीप चिंचोले, प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर.कोल्हे, प्रा.मनीष जोशी, प्रा.अजय पाटील हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना प्रा.इंगळे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केल्यामुळे सायबर गुन्हे घडत आहे. याबाबत जागरुकता व्हावी यासाठी क्विक हिल फौडेशनने कमवा व शिका योजना संगणकशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षीत विद्यार्थ्यांकडून शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबतची जागरुकता केली जाते. सायबर सेलचे श्री. दिगंबर थोरात म्हणाले की, सायबर सुरक्षिततेबाबतची जागरुकता करण्याचे काम पोलिसांचे आहे मात्र हे प्रशिक्षित विद्यार्थी हे सायबर जागरुकता समाजापर्यंत पोहचवित आहे. त्यामुळे सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होईल. क्विक हिल फौंडेशनचे महेश भरडी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेतील ज्ञान संपादित करुन अधिकाधिक लोकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. प्रास्ताविक करतांना प्रा.राजू आमले यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळा आणि क्वीक हिल फाऊंडेशन, पुणे यांच्यात २०१८ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. २०१८-१९ पासून हया उपक्रमातून समाजातील एक लाख पेक्षा अधिक लोकांमध्ये सायबर जागरुकतेचे कार्य करण्यात आले आहे. सूत्रसंचालन अश्वीनी पाटील व कुंदन गोसावी यांनी केले.
पुढील सत्रात महेश भरडी, दिगंबर थोरात, सुगंधा दाणी यांची सायबर सुरक्षितता आणि जागरुकता या विषयावरील व्याख्याने झाली. या कार्यशाळेत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.