नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने ६ पदके जिंकली यातील सर्वाधिक तीन पदके नेमबाजांनी मिळवून दिली. खंरतर आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरीही ठरली. त्यामुळे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा गुणगौरव करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्नील कुसळे यांनी नेमबाजीमध्ये भारतासाठी तीन कांस्यपदके मिळवून दिली आहेत. नेमबाजीमध्ये भारतासाठी आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना एनआरएआयतर्फे रोख बक्षिसेही जाहीर झाली आहेत. भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकून नेमबाजीमध्ये विक्रम रचणा-या मनू भाकरला ४५ लाख रुपये, ५० मीटर एअर रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला तिसरे कांस्य पदक मिळवून देणा-या स्वप्नील कुसळेला ३० लाख रुपये, तर मनू भाकर सोबत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र गटात भारताला कांस्यपदक मिळवून देणा-या सरबजोत सिंगला १५ लाख रुपये बक्षीस एनआरएआयकडून जाहीर झाले आहे.