चाळीसगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफीला वेळ लागणार हे समजू शकतो पण अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली मदत तात्काळ द्यावी, त्याबाबत शासनाची जी काही भूमिका असेल ती स्पष्ट करावी, मदत देणार नसाल तर तस सांगावे अन्यथा शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे मंगेश चव्हाण यांनी विधानसभेत केली.
ते राज्यपालांच्या अभिभाषणावर सूर असलेल्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली. चाळीसगाव तालुक्यातील शेती ट्रान्सफॉर्मरसाठी ऑइल नसल्याने २७ ट्रान्सफॉर्मर ३-३ महिने बंद असतात, आधीच अवकाळी पावसाने एक पीक हातातले गेले असताना दुसरे पिकसुद्धा वीज नसल्याने वाया जाणार असल्यास शेतकरी कसा उभा राहणार? त्यासाठी आवश्यक अश्या उपाययोजना तात्काळ करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
चाळीसगाव नगरपरिषद मध्ये मागील ६ महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना यासारखी शेकडो कोटींची कामे निकृष्ट दर्जाचे सुरू आहेत. नगरपालिकेतील काही ठराविक अधिकारी चिरीमिरी घेऊन या भ्रष्टाचाराला साथ देत आहेत. नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी नगरपालिकेत मागील १५ वर्षात झालेला भ्रष्टाचार बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. नगरपालिकेत मागील काळात १० टक्के जादा दराने देण्यात आलेले नियमबाह्य टेंडर, १० पट जादा दराने घेण्यात आलेल्या वस्तू यात मोठा अपहार झाला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.