एरंडोल प्रतिनिधी । नगरपालिकेने न.पा.हद्दीतील ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची येणे बाकी मुदतीत भरणा केलेली नव्हती. अशा मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याकरिता मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी आढावा घेऊन संपूर्ण शहरात थकबाकी वसुली करिता पथकांची नेमणूक केली असून त्यानुसार आज कर न भरणाऱ्या वेअरहाउसला टाळे लावण्याचे काम सुरु आहे.
यावेळी ज्योत्स्ना लाहोटी, अनुराधा लाहोटी यांच्या मालकीच्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गोडाउन / वेअरहाउस या मालमत्तेवर रु.५ लाख ७८ हजार ०३८ कराची थकबाकी व इतर येणे बाकी असल्यामुळे व त्यांना कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना देऊन देखील भरणा केलेला नसल्यामुळे कारवाई करण्यात आली. या कारवाईत संजय ढमाळ प्रशासन अधिकारी, डॉ. अजित भट करनिरिक्षक, किशोर महाजन , रघुनाथ महाजन, एस.आर. ठाकूर, दीपक पाटील, दीपक गोसावी यांच्या पथकाने थकबाकी पोटी पंचनामा करून ज्योत्स्ना लाहोटी, अनुराधा लाहोटी यांच्या मालकीच्या मालमत्तेला टाळे लाऊन सील केले.
थकबाकीदार करदात्यांना कराची रक्कम भरण्याकरिता वारंवार सुचना देऊन तसेच विनंती करुन देखील कराचा भरणा न केल्यामुळे जप्तीची कटू कारवाई करावी लागली. थकीत कर वसुलीची उद्दिष्टपूर्ती करण्याकरिता वसुली मोहिम निरंतर सुरु राहिल त्यात नळ संयोजन बंद करणे , स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करणे अशी कारवाई हाती घेण्यात येत आहे. भविष्यात असा प्रसंग उद्भवू नये, म्हणून सर्व थकीत करदात्यांनी त्यांच्याकडील येणे कराची रक्कम त्वरित न.पा.कोषागारात भरणा करुन नगरपालिकेस सहकार्य करावे. असे अवाहन मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी केले आहे.