सावखेडासीमचा ‘पेसा’ अंतर्गत समावेश व्हावा : आदिवासी बांधवांचा मोर्चा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी समाज बांधवांचे सावखेडासिम या गावाचा गेल्या अनेक वर्षापासून ‘पेसा’ अंतर्गत समावेश न झाल्याने नाराज असलेल्या शेकडो आदिवासी बांधवांनी संघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले .

यावल तालुक्यातील सावखेडासीम हे आदिवासी गाव शासनाच्या नियमानुसार व लोकसंख्येच्या आधारावर पेसा अंतर्गत येत असतांना ही या गावाचा पेसात समावेश न झाल्याने या गाव शिवारात राहणाऱ्या शेकडो आदिवासी बांधवांंना शासनाच्या मिळणाऱ्या अनेक योजनांपासुन वंचित राहावे लागत आहे. दरम्यान सावखेडा सिम या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील असंख्य आदिवासी समाज बांधवांनी सोमवार दिनांक २४ मार्च रोजी यावल पंचायत समितीच्या कार्यालय परिसरातून संघटीत होवुन यावलच्या एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर प्रतिभाताई शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व आदिवासी तडवी भिल एकता मंचचे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी आणि शेकडोआदिवासी बांधावांंनी मागण्यासाठी सुमारे सहा तास आंदोलन केले.

प्रकल्प आधिकारी अरूण पवार हे आंदोलनास्थळी आल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने अखेर प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी आंदोलना ठिकाणी संवाद साधुन सविस्तर माहीती घेत या गावास पेसात घेण्याविषयी राज्य शासनाकडे आपल्या मागणीचा योग्यरित्या पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती या वेळी आंदोलनकर्त्यांना दिली .दरम्यान संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी या मागणीचा शासनस्तरावर तात्काळ पाठपुरावा न झाल्यास येत्या 28 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री उईके यांचा घेराव घालुन आपण जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला . अखेर प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी आदिवासी बांधवांच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आपण सर्वतोपरीने प्रयत करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.

Protected Content