मुंबई प्रतिनिधी । ओला-उबरसारख्या कंपन्यांची सेवा बंद करण्यासह भाडेवाढीच्या मागणीसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून राज्यातील रिक्षा व टॅक्सीचालक संपावर जाणार आहेत.
ओला आणि उबरसारख्या सेवांना मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमिवर, या सेवा बंद करण्यात याव्यात अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत आहेत. याच्या जोडीला आता भाववाढ करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांसाठी उद्या अर्थात ८ जुलै रोजी मध्यरात्रीपासून राज्यातील रिक्षा व टॅक्सीचालक संपावर जाणार आहेत. या संपामध्ये मुंबई, ठाणे व पुण्यासह सर्व मोठ्या शहरांमधील रिक्षा चालक सहभागी होणार असल्याची माहिती आज देण्यात आली आहे.
रिक्षाचालकांच्या मागण्यांमध्ये ४ ते ६ रूपयांची वाढ करावी; ओला-उबरवर बंदी आणावी, रिक्षा चालकांना पेन्शन, ग्रॅच्युईटी आदी लागू करण्यात यावे, रिक्षा चालकांसाठी असणारे कल्याणकारी मंडळ परिवहन खात्याच्या अंतर्गत आणावे अशा मागण्यांचा समावेश आहे.