मुंबई वृत्तसंस्था । आगामी आयपीएल हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. तत्पुर्वी संघमालकांनी आपल्या संघाकडून काही खेळाडूंना करारमुक्त केले आहे. यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी युवराजसिंहला देखील करारमुक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला युवराज सिंह सध्या टी-२० लीग क्रिकेट खेळतो आहे. मुंबई इंडियन्सने बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर आगामी हंगामात युवराज कोणत्या संघात जाणार याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं होतं. २०१९ सालात झालेल्या स्पर्धेसाठी मुंबईने अखेरच्या टप्प्यात युवराजला आपल्या संघात दाखल करुन घेतले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सहमालक वेंकी मैसुर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक सूचक ट्विट करत युवराजला एक आशेचा किरण दाखवला आहे. युवराजसिंह सोबतच मुंबई इंडियन्सने एविन लुईस, अॅडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ, ब्युरान हेंड्रिग्ज, बेन कटिंग, बरिंदर सरन, रसिक सलाम, पंकज जैस्वाल आणि अल्झारी जोसेफ यांनाही करारमुक्त केले आहे. त्यामुळे आगामी हंगामात युवराजसिंह कोणत्या संघाकडून खेळताना दिसेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.